अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस या आजाराचा प्रभाव शरीरात सर्वत्र दिसून येतो. याची लक्षणे एकाच सांध्यापुरती मर्यादित नसतात. आजारी व्यक्तीस ताप, थकवा येऊ शकतो तसेच त्यांचे वजनही कमी होऊ शकते. काही रुग्णांना डोळ्यांचा दाह(लालसरपणा आणि वेदना) होऊ शकतो तर क्वचित काही रुग्णांना फुफ्फुस आणि हृदयाची समस्या देखील उद्भवू शकते. नितंब, गुडघे अथवा घोट्यांमध्ये वेदना, कडकपणा आणि सूज हा त्रासही काही जणांना होऊ शकतो.
- अँकिलोझिंग (अॅंकिलोसिस) : ही संज्ञा मणक्यातील हाडे अयोग्य पद्धतीने जुळण्याशी संबंधित आहे. यामध्ये मणक्याची हाडे अयोग्यरित्या एकत्र सांधली गेल्यामुळे मणका बांबू सारखा टणक होतो. स्पॉन्डिलायटिस : ही संज्ञा व्यापक आहे, ज्यामधे मणक्याच्या सांध्यांवर येणारी सूज आणि लालसरपणा यांचा समावेश असतो. कृपया लक्षात घ्या, ‘स्पॉन्डिलोसिस’ हा पूर्णपणे भिन्न शब्द आहे. हा शब्द मणक्याची झीज झाल्यामुळे होणार्या आजाराचे वर्णन करताना वापरतात. AS हा संधिवाताचा एक प्रकार आहे जो प्रामुख्याने मणक्यावर परिणाम करतो. कधीकधी शरीरातील इतर सांध्यांवर तसेच इतर अवयवांवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. AS हा तरुणांमध्ये आढळणारा आजार आहे.
- अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस (AS) ची लक्षणे कोणती?
पाठदुखी – पाठीच्या खालच्या भागात होणार्या वेदना हे AS चे प्रमुख लक्षण आहे. तसेच नितंब व मांड्यांच्या मागच्या भागातही वेदना जाणवू शकतात. विश्रांती घेतल्याने AS च्या वेदना कमी होत नाहीत. उलट, व्यायाम व हालचाल केल्याने मात्र वेदनांचे प्रमाण कमी होऊ शकते. या वेदनांचे प्रमाण सकाळी उठल्यावर अधिक असते.
- महत्त्वाची वैशिष्ट्ये –
१ – वयाच्या चाळिशीपूर्वी सुरुवात होते.२ – या आजाराची लक्षणे उशिरा व हळूहळू जाणवू लागतात.३ – वेदनांचे प्रमाण सकाळी आणि संध्याकाळी सर्वात अधिक असते.४ – सकाळी उठल्यावर किंवा दीर्घकाळ एका जागी बसल्यावर आखडल्यासारखे वाटते.
५ – व्यायामाने किंवा हालचाल केल्यावर वेदना कमी होतात तर विश्रांतीमुळे त्रास वाढतो.
६ – अनेकदा नितंबांमध्येही वेदना होऊ शकतात.
- अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस कोणाला होऊ शकतो?
सरासरी दर २०० व्यक्तींपैकी एका व्यक्तीला अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो. सर्वसाधारणपणे १५ ते २५ या वयोगटाच्या दरम्यान या आजाराची सुरुवात होते, परंतु काहीवेळा तो लहान मुलांत किंवा प्रौढ व्यक्तींतही आढळून येतो. सामान्यतः स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते. वैद्यकीय पार्श्वभूमी बघितल्यास कुटुंबातील दोन किंवा अधिक व्यक्तींना हा आजार असू शकतो.
- अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस कशामुळे होतो?
हा आजार आपल्या कोणत्या चुकीच्या कृतीमुळे होत नाही. AS हा एक रोगप्रतिकारशक्तीचा आजार आहे. शरीराच्या रोगप्रतिकार संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याने हा आजार होतो. काही अनाकलनीय कारणामुळे ही संस्था चुकून स्वत:च्याच शरीरातील सांध्यांच्या पेशींवर हल्ला करते व त्यामुळे सांध्यांना सूज येते. वेळीच उपचार न केल्यास सांधे/ मणके कायमचे खराब होऊ शकतात. हा आजार होण्याचे कारण आनुवंशिकतेशी किंवा जनुकीय साखळीशी निगडीत आहे. या आजाराच्या बहुतांशी रुग्णांमध्ये HLA-B २७ नावाचे जनुक आढळते. या जनुकामुळे हा आजार होण्याची शक्यता जास्त असली तरी हे जनुक असणार्यांपैकी सुमारे ८ % लोकांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे, आपल्या शरीरात HLA-B २७ जनुक असेल तर त्यामुळे आपल्याला AS होईलच असे ठामपणे सांगता येत नाही.
- अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान कसे होते?
अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान अनेक बाबींवर आधारित असते, त्यापैकी काही महत्वाचे घटक:
– आजाराची लक्षणे
– डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी
– पाठीच्या कण्याचा व कंबरेच्या सांध्याचा (Sacro-iliac joints) MRI किंवा X-ray
– रक्त तपासणीचा रिपोर्ट
- AS वर कोणते उपचार उपलब्ध आहेत?
अलीकडच्या काळात AS संदर्भात प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध झाल्याने विविध प्रकारे उपचार करणे शक्य झाले आहे. वेदनाशमन, व्यायाम व disease modifying (आजाराची तीव्रता कमी करणारी) औषधे यांचा वापर करून AS वर नियंत्रण ठेवता येते. आजार वाढण्यावर नियंत्रण ठेवणे, वेदना कमी करणे, ताठरपणा कमी करून पाठीचा कणा लवचिक करणे व त्यायोगे तुम्हाला सामान्य जीवन व्यतीत करता येणे हा आधुनिक उपचार पद्धतीचा उद्देश असतो. आजार प्रारंभीक अवस्थेत असतानाच संधिवात तज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घेणे आवश्यक असते. संधिवात तज्ञ वापरत असलेल्या नवीन जैविक (Biologics) औषधांमुळे आजाराचा फैलाव थांबवणे किंवा फैलावाचा वेग कमी करणे शक्य झाले आहे. साध्या वेदनाशामक औषधांनी सांध्यांना होणारी इजा थांबवता येत नाही. अॅलोपथीचे डॉक्टर फक्त स्टिरॉइड्स व वेदनाशामक औषधेच देतात हा गैरसमज आहे. ते आजाराची तीव्रता कमी करणारी अशी औषधे देतात, ज्यामुळे आजार वाढण्याचा वेगही कमी होतो.
- जैविक औषधे ((Biological therapy)
AS वरील उपचार पद्धतीत खूपच प्रगती झाली आहे. विशेष करून ज्या रुग्णांना सल्फासाल्झीन सारख्या पारंपारिक औषधांनी (DMARDs) गुण येत नाही त्यांच्यासाठी ही नवीन उपचार पद्धती लाभदायक आहे. यांतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे biologics -जैविक औषधे.
या औषधांना biologics – जैविक असे संबोधले जाण्याचे कारण म्हणजे त्यांची निर्मिती जिवंत घटकांपासून किंवा उच्च कोटीचे जैवतंत्रज्ञान वापरून केली जाते. संधिवातासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक औषधांपेक्षा ही पुष्कळ भिन्न आहेत. रोगप्रतिकारक संस्थेतील सर्व घटकांऐवजी ठरावीक घटकांवरच ही औषधे परिणाम करतात (Targeted therapy). यांपैकी काही उपचारपद्धती या Tumour Necrosis Factor (TNF) विरोधी असतात. ही औषधे TNF प्रथिनांवर परिणाम करतात. ही प्रथिने शरीरात जास्त प्रमाणात असल्यास सूज व दाह यांचा त्रास होतो. अन्य जैविक उपचारपद्धती वेगवेगळ्या प्रथिनांवर कार्य करतात.
ही नव्या काळातील औषधे गेल्या केवळ १० ते १५ वर्षांत उपलब्ध होऊ लागली आहेत. ही (biologic) उपचारपद्धती अन्य काही नावांनीही ओळखली जाते, जसे : biologic agents, biologics, biological response modifiers or immunotherapy.
जेव्हा AS संदर्भातील अन्य उपचार अयशस्वी ठरतात तिथे जैविक औषधे AS चा फैलाव रोखण्यात मदत करतात. अर्थात, आधी झालेली सांध्यांची अथवा मणक्याची झीज ती भरून काढू शकत नाहीत, परंतु अजून जास्त तसेच कायमस्वरूपी नुकसान होण्यापासून ती सांध्यांचे रक्षण करतात. संधिवात, सोरायसिस, सोरायटिक संधिवात, SLE (लुपस) अशा अन्य काही आजारांमध्ये देखील biologics या उपचार पद्धतींमुळे आमूलाग्र बदल झाला आहे.
- जीवनशैलीमध्ये बदल केल्यास लाभ होऊ शकतो का?
तुमच्या जीवनशैलीमध्ये दोन बदल करणे महत्वाचे ठरते. एक म्हणजे व्यायाम करणे व दुसरा बदल म्हणजे धूम्रपान बंद करणे. व्यायामाच्या बाबतीत तज्ज्ञ व्यक्तीचा (Physiotherapist) सल्ला घ्यावा. आहारविषयक पथ्य पाळल्याने आजार नियंत्रणात राहतो हा एक गैरसमज आहे.
• तुम्हाला अनेक दिवस किंवा आठवडे, रोज ६ ते ८ शांत झोप झाल्यानंतरही अतिशय थकवा किंवा गळून गेल्यासारखे वाटते का?
- अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिससाठी फिजिओथेरेपी :
अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिसच्या उपचारांमध्ये फिजिओथेरेपी हा एक महत्वाचा घटक आहे. आपल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तसेच कणा व इतर सांध्यांची हालचाल करण्याची क्षमता टिकून राहण्यासाठी फिजिओथेरेपिस्ट व्यायामाचे योग्य शेड्यूल आखून देतात. वाकल्यावर पाठ आणि मान आखडणे टाळण्यासाठी त्यांचे विशेष व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. बसण्याच्या, उभे राहण्याच्या तसेच झोपण्याच्या योग्य पद्धतीबद्दल फिजिओथेरपिस्ट मार्गदर्शन करतात. ते हायड्रोथेरपी सुद्धा देतात, ज्यामध्ये गरम पाण्याच्या पूलमध्ये शिरून करावयाच्या काही व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. पोहोण्याच्या व्यायामानेसुद्धा बरीच सुधारणा होऊ शकते.