स्क्लेरोडर्मा

स्क्लेरोडर्मावरील उपचार
  • स्क्लेरोडर्मा (सिस्टमिक स्क्लेरोसिस) : स्क्लेरोडर्मा किंवा सिस्टेमिक स्क्लेरोसिस हा संधिवाताचा एक ऑटोईम्युन आजार आहे. दोन ग्रीक शब्दांपासून स्क्लेरोडर्मा हा शब्द बनला आहे : स्क्लेरो म्हणजे कठीण आणि डर्मा म्हणजे त्वचा. राठ आणि कडक होत जाणारी त्वचा हे या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन(एक संयुक्त ऊती) निर्माण झाल्याने व ते साठून राहिल्याने हा आजार होतो. यामुळे त्वचा (डर्मा) आणि शरीराचे अंतर्गत अवयव जसे फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदय आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट ताठर व कडक (स्क्लेरोसिस) होऊ लागतात. दुर्दैवाने, भारतात फार कमी जणांना या आजाराविषयी माहिती आहे. प्रत्येक रुग्णानुसार स्क्लेरोडर्माची लक्षणे आणि तीव्रता बदलत जाते. स्क्लेरोडर्माच्या बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येणारे सामान्य लक्षण म्हणजे त्वचा राठ होणे. तसेच, त्वचा कडक होत जाणे हेही स्क्लेरोडर्माचे एक सामान्य लक्षण आहे. स्क्लेरोडर्माच्या वाढीचा वेग प्रचंड असल्यामुळे तो वेगाने पसरत जातो. स्क्लेरोडर्मा प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याची लक्षणे ओळखून उपचार सुरू केल्याने शरीरातील ऊती व अवयवांची कायमस्वरूपी हानी टाळणे शक्य होते.
स्क्लेरोडर्माविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
  • स्क्लेरोडर्मा म्हणजे काय?

स्क्लेरोडर्मा किंवा सिस्टेमिक स्क्लेरोसिस हा संधिवाताचा एक ऑटोईम्युन आजार आहे. दोन ग्रीक शब्दांपासून स्क्लेरोडर्मा हा शब्द बनला आहे : स्क्लेरो म्हणजे कठीण आणि डर्मा म्हणजे त्वचा. राठ आणि कडक होत जाणारी त्वचा हे या आजाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन(एक संयुक्त ऊती) निर्माण झाल्याने व ते साठून राहिल्याने हा आजार होतो.

 

  • स्क्लेरोडर्मा कोणाला होऊ शकतो? 

स्क्लेरोडर्मा हा आजार सामान्यतः प्रौढांमध्ये आढळून येतो. हा आजार स्त्रियांमध्ये आढळण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा चौपट जास्त असते. सर्वसाधारणपणे २५ ते ५५ या वयोगटातील तरुण आणि मध्यमवयीन प्रौढांमध्ये हा आढळतो, परंतु याहून कमी वयाची मुले अथवा वृद्धांमध्येही तो आढळून येऊ शकतो.

 

  • स्क्लेरोडर्माचे (सिस्टमिक स्क्लेरोसिस) प्रकार कोणते?

सिस्टमिक स्क्लेरोसिसचे दोन प्रकार आहेत, लिमिटेड क्युटॅनियस सिस्टमिक स्क्लेरोसिस आणि डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिस.

  1. लिमिटेड क्युटॅनियस सिस्टमिक स्क्लेरोसिस : तुलनात्मकरित्या कमी गंभीर स्वरूपाच्या या आजारामध्ये, मुख्यत्वेकरून हात, पाय आणि चेहेर्‍याची त्वचा राठ होऊ लागते, परंतु त्याचबरोबर याचा परिणाम फुफ्फुसांवर आणि पचन संस्थेवर देखील होऊ शकतो. कालांतराने हा त्रास वाढत जातो, तरीही डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिसपेक्षा त्याची गंभीरता कमी असते व बर्‍याचदा उपचारांनी हा आजार नियंत्रणात येऊ शकतो.
  2. डिफ्यूज सिस्टमिक स्क्लेरोसिस : या आजाराचा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर जास्त प्रभाव पडण्याची शक्यता असते. त्वचा राठ झाल्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. याची लक्षणे अचानक दिसू लागतात आणि आजारपणाच्या पहिल्या काही वर्षातच अवस्था बिकट होऊ लागते. परंतु, ही स्थिती नंतर सामान्य होत जाऊन स्थिर होते आणि त्वचेमध्ये हळूहळू सुधार होत जातो.
  • स्क्लेरोडर्माची लक्षणे कोणती?

रेनोज् फिनॉमेनॉन (रक्ताभिसरण होण्यात येणार्‍या अडथळ्यांमुळे हातापायाची बोटे थंड पडून ती निळी-पांढरी होणे), हात, पाय आणि चेहेर्‍याची त्वचा राठ/कडक होणे, त्वचेवर लाल डाग उठणे, छातीत जळजळ आणि गिळण्याची समस्या (डिस्फेगिया). चेहर्‍याची त्वचा तीव्र स्वरुपात राठ झाल्याने तोंडाचा आकार आकसून लहान होऊ शकतो. वजन कमी होणे, थकवा, सांधेदुखी, पुरळ उठणे, अल्सर आणि स्नायू दुखणे/ अशक्तपणा अशी इतर लक्षणेही दिसून येऊ शकतात. सिस्टमिक स्क्लेरोसिसच्या काही प्रकारांमध्ये, हृदय, फुफ्फुसे किंवा मूत्रपिंडासारख्या अवयवांवर परिणाम होतो. यामुळे विविध गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे धाप लागणे, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसीय उच्च रक्तदाब.

  • स्क्लेरोडर्मा कशामुळे होतो?

स्क्लेरोडर्मा हा शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेजन निर्माण झाल्याने होणारा एक ऑटोईम्युन आजार आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार करणार्‍या रचनेतील एक भाग अनियंत्रितपणे अति-सक्रिय होतो. त्वचेखालील पेशी तसेच शरीराचे अंतर्गत अवयव आणि रक्त वाहिन्यांच्या आसपास असणार्‍या संयुक्त पेशींवर रोगप्रतिकारक प्रणाली चुकून हल्ला चढवते. यामुळे संयुक्त ऊतींमधील पेशी अधिक प्रमाणात कोलेजन तयार करू लागतात. परिणामस्वरूप या ऊती दुखावल्या जातात आणि राठ होऊ लागतात (फायब्रोसिस). असे का घडते याचे स्पष्ट कारण उपलब्ध नाही.

  • स्क्लेरोडर्मा आनुवंशिक आहे का?

जर आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यास स्क्लेरोडर्मा झाला असेल, तर आपल्याला हा आजार होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत जास्त असते. या आजाराची लक्षणे जाणवत असल्यास संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरते.

  • स्क्लेरोडर्मा हा आजार किती गंभीर आहे?

स्क्लेरोडर्माच्या प्रत्येक रुग्णामध्ये आढळणार्‍या लक्षणांमध्ये तसेच रुग्णावर होणार्‍या आजाराच्या परिणामामध्ये मोठ्या प्रमाणावर भिन्नता आढळते. या आजाराचा परिणाम सौम्य ते जीवास धोकादायक ठरेल इतका गंभीरही असू शकतो. शरीराच्या कोणत्या भागांमध्ये आणि किती प्रमाणात आजार पसरला आहे, यावर ही गंभीरता अवलंबून असते. वेळीच योग्य उपचार घेतले नाहीत तर सौम्य स्वरुपात असणारा आजार गंभीर रूपही धारण करू शकतो. तज्ज्ञ डॉक्टरांकडून झालेले आजाराचे अचूक आणि लवकर निदान, तसेच योग्य उपचारांमुळे स्क्लेरोडर्माचा प्रभाव कमी होऊ शकतो व त्यामुळे कायमस्वरूपी हानी होणे टाळता येऊ शकते.

  • स्क्लेरोडर्माच्या रुग्णांना फुफ्फुसांना लागण होण्याचा काही विशेष धोका असतो का?

स्क्लेरोडर्माच्या रोगपरिक्षणामध्ये फुफ्फुसे हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे, स्क्लेरोडर्माच्या रुग्णांमध्ये होणार्‍या सुधारणेचे प्रमाण निश्चित करण्यास मदत होते. यासाठी इकोकार्डियोग्राम आणि फुफ्फुसांची कार्यचाचणी करणार्‍या तपासण्या करणे आवश्यक असते. फुफ्फुसांचा आजार हे स्क्लेरोडर्मा या आजाराची गुंतागुंत वाढविणारे तसेच स्क्लेरोडर्मामुळे होणार्‍या मृत्युचे एक प्रमुख कारण असते.

  • स्क्लेरोडर्मावर उपचार घेण्यासाठी कोणाकडे जावे?

संधिवाततज्ज्ञ या रोगाचे जाणकार असतात. आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.

  • स्क्लेरोडर्माचे निदान कसे केले जाते?

स्क्लेरोडर्माचे निदान करणारी कोणती एक अशी ठराविक चाचणी नाही. संपूर्ण वैद्यकीय इतिहास, आरोग्य तपासण्या आणि विशिष्ट रक्त चाचण्या यांची मदत स्क्लेरोडर्माचे निदान करण्यात होत असते.

  • पोषण आणि आहार विषयक पथ्य यांची या आजारात काय भूमिका असते?

आहारावर घातलेले निर्बंध स्क्लेरोडर्माच्या नियंत्रणास थेट मदत करतात असा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. लिंबू, टोमॅटो यांसारखे आंबट पदार्थ आणि वांग्यासारख्या भाज्या हे आवश्यक पोषक तत्वांचे महत्वाचे स्त्रोत आहेत. अपुरा आहार घेतल्यामुळे सांधे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे स्क्लेरोडर्मावर उपचार करणे कठीण होते. संतुलित आहार घेतल्याने आरोग्य चांगले राहण्यास व वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • स्क्लेरोडर्माचा इलाज करण्यासाठी पूरक थेरपी उपयुक्त ठरते का?

काही लोक केवळ वनौषधी, तेल, विशेष आहार किंवा व्यायाम करून बरे झाल्याचा दावा करतात. तथापि, अशा प्रकारचे उपचार स्क्लेरोडर्मा बरा करतात याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. महत्वाचे म्हणजे, अशा अनिश्चित उपचार पद्धतींचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच उपचारास विलंब झाल्यास सांध्यांचे कायमचे नुकसान होऊ शकते.

  • स्क्लेरोडर्मासाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत?

अलीकडच्या काळात स्क्लेरोडर्मा संदर्भात होत असणार्‍या प्रगतीमुळे या आजारासाठी उपचारांचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. संधिवाततज्ज्ञ या रोगाचे जाणकार असतात. आजारपणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सल्ला घेणे उचित ठरते. संधिवाततज्ज्ञांकडून दिल्या जाणार्‍या उपचारांमुळे रोग वाढण्याचा वेग कमी होऊ लागतो. स्क्लेरोडर्मा सक्रिय नसताना काही रुग्णांचे उपचार थांबवता येऊ शकतात. प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत दिसून येणार्‍या परिणामांमध्ये बरेच वैविध्य असते. त्यामुळे, प्रत्येक रुग्णाला दिले जाणारे उपचार वेगवेगळे असतात. एलोपॅथीचे डॉक्टर्स फक्त स्टिरॉइड्स व वेदनाशामक औषधेच देतात हा गैरसमज आहे. उलट, ते रोगानुरूप अशी औषधे देतात जेणेकरून आजार वाढण्याचा वेग कमी होतो. संधिवाततज्ज्ञ वापरीत असलेल्या नव्या (जैविक) उपचार पद्धती अनेक रुग्णांसाठी लाभदायक ठरतात व त्यामुळे आजार वाढण्याचा वेग मंदावतो.