संधिवाताचे उपचार
नावाप्रमाणेच, त्याचे दोन भाग आहेत.
१. संधी : दोन किंवा अधिक हाडे एकमेकांशी जोडली जातात आणि सांधा अथवा संधी तयार होतो. वात: ही संज्ञा सांध्यांमधील दाह (वेदना आणि सूज) या संदर्भात वापरली जाते.
२. संधि-वात : (ज्याला आर्थरायटिस म्हणूनही ओळखले जाते) ही एक व्यापक संज्ञा आहे, ज्यामध्ये सांध्यांची सूज (सूज आणि लालसरपणा) यांचा समावेश असतो. यामध्ये संधिवाताच्या शंभरहून अधिक वेगवेगळ्या आजारांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे जेव्हा संधिवाताबद्दल बोलले जाते, तेव्हा ते या आजारांपैकी सर्वात सामान्यपणे आढळणार्या ऑस्टियोआर्थरायटिस(OA) बद्दल असते. वयोमानामुळे, एखाद्या विशिष्ट दुखापतीमुळे, अतिरिक्त वजन अथवा शारीरिक हालचालीमुळे सांध्यांवर येणारा ताण अशा विविध कारणांमुळे सांध्यांची होणारी झीज हे या आजाराचे मुख्य कारण आहे. साधारणपणे संधिवाताशी संबधित कोणताही आजार वृध्दापकाळाशी जोडला जातो. परंतु दुसरा प्रकार, आमवात अथवा रुमॅटॉइड आर्थराइटिस(RA) हा तरुणांमध्ये आढळणारा आजार आहे. दुर्दैवाने RA या आजाराची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित असणार्या संधिवाताचाच एक प्रकार असणार्या आमवातासारख्या(RA) आजाराकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही. भारतातील वास्तविकता अशी आहे, की बहुसंख्य लोकांना संधिवाताबद्दल नीटशी माहिती नसते.
- नुकतेच आमवाताचे निदान झालेल्या ३० वर्षीय आयटी व्यावसायिक – कुमारी के. यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. त्या म्हणतात, या आजाराचे निदान झाल्यानंतर हे लक्षात आले की, सामान्यतः लोकांना संधिवात माहिती असतो, परंतु, आमवात काय आहे हे कोणालाही माहिती नसते. बहुतांशी लोकांची ‘संधिवात होण्यासाठी ३० हे वय खूपच कमी आहे’ अशी प्रतिक्रिया असल्याचे तसेच ‘यावर आयुर्वेदिक उपचार घ्यावे, पथ्यपाणी व व्यायामाचा उपयोग होईल’ असे सल्लेही लोकांकडून मिळाल्याचे त्यांनी संगितले.
- अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात होत असणार्या प्रगतीमुळे संधिवाताची चिकित्सा करण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. या आजारात रुमॅटोलॉजिस्ट म्हणजेच संधिवाततज्ज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घेणे उचित ठरते. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये डॉक्टर्स फक्त स्टिरॉइड्स व वेदनाशामक औषधेच देतात हा गैरसमज आहे. साधी वेदनाशामक औषधे सांध्यांचे होणारे नुकसान भरून काढू शकत नाहीत. संधिवाततज्ज्ञ आजाराची तीव्रता कमी करणारी अशी औषधे देतात, ज्यामुळे आजार वाढण्याचा वेगही कमी होतो. उपचार पद्धतींमध्ये होत असणार्या प्रगतीमुळे रोगाची वाढ रोखण्यास मदत होते. योग्य उपचार घेतल्यास संधिवाताच्या बहुतांशी रुग्णांना सामान्य जीवन जगणे शक्य होते.
-
पुण्यातील संधिवाततज्ज्ञ
संधिवाताच्या विशेषज्ञ डॉक्टरांना रुमॅटोलॉजिस्ट म्हणून ओळखले जाते. ते संधिवात आणि संधिवाताशी संबंधित रोगांचे निदान आणि उपचार करतात. सांधे, हाडे, स्नायू आणि इतर अंतर्गत अवयवांवर (उदा. मूत्रपिंड, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, मेंदू) परिणाम करणार्या विविध प्रकारच्या 200 हून अधिक आरोग्य समस्यांवर संधिवाततज्ज्ञ उपचार करतात. संधिवात आणि संबंधित रोगांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यावर संधिवाततज्ज्ञ भर देतात. संधिवात, विशिष्ट ऑटोइम्युन रोग, वास्क्युलायटिस, मस्क्युलस्केलेटल वेदनांचे विकार तसेच ऑस्टियोपोरोसिस यांवर संधिवाततज्ज्ञ उपचार करतात. यामध्ये रुमेटॉईड आर्थरायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, गाऊट, पाठदुखी, ऑस्टियोपोरोसिस, लुपस आणि टेंडिनायटिस यांसारख्या आजारांचा समावेश आहे. यापैकी काही आजार एवढे गंभीर आहेत की ज्यांचे निदान व त्यावरील उपचार बिकट आहेत.