व्यायाम
विश्रांती आणि कामामध्ये समतोल साधणे : संधिवाताचे आजार असणार्या व्यक्तींसाठी पुरेसा आराम मिळेल अशा रीतीने कामे व अन्य ऍक्टिव्हिटीज आणि विश्रांती यांमध्ये समतोल साधणे अतिशय महत्वाचे असते. हा समतोल साधण्यासाठी आपले शरीर देत असलेले संकेत ओळखणे गरजेचे असते. संधिवाताच्या अनेक आजारांचे एक लक्षण म्हणजे वारंवार येणारा थकवा होय. आजाराच्या काळात वेदना आणि थकवा यांचे प्रमाण कधी तीव्र तर कधी नगण्य असू शकते. वेदना किंवा थकवा अनुभवताना, विश्रांती घेणे आवश्यक असते. तथापि, प्रमाणाबाहेर विश्रांती घेतल्यास स्नायू कमकुवत होऊ शकतात तसेच सांध्यांमध्ये ताठरपणा येऊ शकतो.
शारीरिक व्यायामामुळे लवचिकता, स्नायूंची शक्ती आणि सहनशक्ती वाढते. तसेच सांध्यांमधील वेदना आणि ताठरपणा कमी होऊ लागतो. वजन घटविल्यामुळे दुखर्या सांध्यांवरील ताण कमी होतो, तसेच एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी सहाय्य मिळते. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी, संधिवात असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करावी.
व्यायामाविषयी असणारे काही समज
- मी माझी सर्व घरगुती कामे कोणाच्याही मदतीशिवाय करत असल्याने मला कोणत्याही व्यायामाची गरज नाही.
- मी नियमितपणे ‘प्राणायाम’ आणि कपालभाती करते/करतो.
- मी दररोज संध्याकाळी मित्रांबरोबर चालायला जाते/जातो.
- योग केल्याने माझ्या सांधे / स्नायूंना हानी पोहोचणार नाही.
- व्यायाम केवळ सकाळीच केला पाहिजे.
आहार
समतोल आहार : आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच समतोल आहारही फायदेशीर ठरतो. ज्यांना गाऊट आहे त्यांच्यासाठी आहार प्रामुख्याने महत्वाचा ठरतो. गाऊट असणार्या व्यक्तींनी अल्कोहोलचे तसेच प्रथिनांचे प्रमाण अधिक असणार्या पदार्थांचे (उदा. प्राणिज मांस) सेवन टाळावे.
आहाराविषयी असणारे काही समज
संधिवाताचा आजार असणार्या रुग्णांना होणार्या वेदनांचे प्रमाण एवढे असते की त्यामधून आराम मिळविण्यासाठी ते आहारामध्ये विविध बदल करून पाहतात. बर्याचदा विविध पर्यायी थेरपी आणि आहारावर निर्बंध घालणारे बदल करून बघितल्यानंतर रुग्ण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार करतात. अपुर्या अथवा चुकीच्या आहारामुळे त्यांचे सांधे आणि स्नायू कमजोर होतात व त्यामुळे आजारावर उपचार करणे अजूनच कठीण जाते. आम्लयुक्त फळे व भाज्या जसे लिंबू, टोमॅटो, वांगी हे आवश्यक पोषक तत्वांचे फार महत्वाचे स्रोत आहेत. संधिवाताच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आहारावर घातलेले निर्बंध फायदेशीर ठरतात हे सिद्ध करणारे कोणतेही शास्त्रीय पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.